पार्थ पवारांनी सस्पेन्स संपवला! प्रफुल्ल पटेल- सुनील तटकरेंवर केलेल्या आरोपावर केला खुलासा, निष्ठावान योगदान त्यांचे…

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी आहेत. त्यांच्या अपघाताचा थेट रोष राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावर वारंवार उफाळून आला. त्यात त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या एका पत्रामुळे वेगवेगळे दावे केले जात आहेत. यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार पार्थ पवार यांनी या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

पार्थ पवार म्हणाले की, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना कोणतेही कारण नसताना लक्ष्य केले जात आहे.निराधार बातम्या आणि केवळ तर्क-वितर्कांवर आधारित कथा यांद्वारे प्रफुल्ल पटेलजी आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांचे अनेक दशकांचे निष्ठावान योगदान आणि नेतृत्व आजही आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत आहे. अशा वरिष्ठ नेत्यांना बनावट वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असून, याचा ठामपणे निषेध केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट सांगितलं.
दरम्यान अजितदादांचा अपघात झाल्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी अजितदादा पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे एक पत्र पाठवण्यात आलं.यावर सुनील तटकरे,प्रफुल्ल पटेल, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.घटनेत बदल करून कार्याध्यक्ष यांच्याकडे पूर्ण अधिकार असतील असे सांगण्यात आलं. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील नव्हती. त्यानंतर त्यांच्याकडून ही निवडणूक आयोगाला हे पत्र ग्राह्य धरू नये असे पत्र लिहिण्यात आलं होतं.

तसेच यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी देखील अजितदादांचा मृत्यू झाल्यानंतर पटेल आणि तटकरे यांना राष्ट्रवादी पक्षाचा ताबा घ्यायचा होता असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावर तटकरे यांनी आरोपांना पत्रकार परिषदेतून उत्तर देणार असल्याची माहिती देखील समोर आली होती. मात्र राष्ट्रवादी पक्षावर होणाऱ्या या आरोपावर आता पार्थ पवारांनी थेट उत्तर दिल आहे. त्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.