एप्रिलच्या पहिल्याच दिवशी गॅस दरवाढ; हॉटेल-रेस्टॉरंट मालकांचे बजेट कोलमडले…


नवी दिल्ली : युद्धाचा थेट परिणाम आता इंधन दरांवर दिसू लागला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या मोठ्या वाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही झाला असून, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. नव्या दरांमुळे व्यावसायिकांना आता पूर्वीपेक्षा अधिक खर्च करावा लागणार आहे.

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी जाहीर केलेल्या ताज्या माहितीनुसार, व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत थेट १९५.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये या सिलिंडरची किंमत आता २,०७८.५० रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी १ मार्च रोजीही या सिलिंडरच्या दरात ११४.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती.

ही वाढ व्यावसायिकांसाठी मोठा आर्थिक झटका ठरत असली, तरी सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरमध्ये मागील ७ मार्च रोजी ६० रुपयांची वाढ झाली होती आणि त्यानंतर दर स्थिर आहेत. सध्या दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरसाठी ९१३ रुपये मोजावे लागत आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम तसेच हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या प्रमुख सरकारी इंधन कंपन्यांकडून दर महिन्याच्या सुरुवातीला जागतिक निकष आणि चलनाचे मूल्य तपासून एलपीजी तसेच एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या किमती निश्चित केल्या जातात.

सध्या मध्य पूर्वेतील संघर्षामुळे ऊर्जेच्या पुरवठ्यात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर जवळपास ५० टक्क्यांनी उसळले आहेत. हा संघर्ष सुरू झाल्यापासून झालेली ही सलग तिसरी दरवाढ आहे.

एकीकडे गॅसच्या किमतींमध्ये वाढ होत असताना, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत मात्र ग्राहकांना दिलासा कायम आहे. कारण या इंधनांच्या किमतींमध्ये अलीकडे कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील वर्षी मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. सध्या राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर ९४.७२ रुपये असून, डिझेलचा दर ८७.६२ रुपये प्रति लिटर इतका आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!