विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा परिणाम; लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याचे ढीग साचले…


 लोणी-काळभोर : पुणे शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मुळा-मुठा नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून लोणी-काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींसह परिसरातील गावांकडून दररोज कचरा टाकला जात असल्याच्या निषेधार्थ एमआयटी शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी ‘कचरा बंद’ आंदोलन छेडले आहे.

परिणामी, दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीतील लोकवस्तीत कचरा न उचलल्याने अक्षरशः कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो म्हणून ४ मार्च रोजी आंदोलन करत कचरा वाहून नेणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ट्रॅक्टरांना कॅम्पसमधून नदीपात्राकडे जाण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर पोलिस उपआयुक्तांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींना कचरा प्रश्न निकाली काढण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती.

मात्र, मुदत संपूनही नदीपात्रात कचरा टाकणे सुरूच राहिल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा १३ मार्च रोजी आंदोलन छेडत नदीपात्राकडे जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्यांना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर अडविले. आंदोलन सुरू होऊन पाच दिवस उलटूनही कोणताही तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्याप कायम आहे.

यानंतर हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, लोणी-काळभोरचे अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते तसेच दोन्ही ग्रामपंचायतींचे माजी सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी नदीत थेट टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. परंतु या प्रश्नावर अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींना नोटीस बजावत शास्त्रोक्त पद्धतीने कचरा व्यवस्थापन, वर्गीकरण व विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिल्या असून मुळा-मुठा नदीपात्रात कचरा टाकण्यास त्वरित बंदी घालत तातडीने पर्यायी जागेची व्यवस्था करावी, असे निर्देश दिले आहेत.

तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे कार्यालयानेही पुणे जिल्हा परिषद तसेच दोन्ही ग्रामपंचायतींना नोटीस जारी केली आहे. नदीपात्रात कचरा टाकणे अत्यंत गंभीर बाब असून तो तातडीने थांबवून सदर प्रकरणी येत्या सात दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासह, उपअधीक्षक भूमिलेख, हवेली यांनी ११ मार्च रोजी सद्यस्थितीत कचरा टाकल्या जाणाऱ्या जागेची मोजणी केली. त्यानंतर १६ मार्च रोजी परिपत्रक काढत गट क्रमांक ११३ ही जागा मुळा-मुठा नदीपात्रातच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता दोन्ही ग्रामपंचायतींना कचरा व्यवस्थापनासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

यांवर तोडगा काढण्यासाठी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने ग्रामसभेत कचरा व्यवस्थापनासाठी पर्यायी जागेची मागणी प्रशासनाकडे करण्याचा ठराव मंजूर केला. तसेच पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत त्यांच्या हद्दीतील कचरा हडपसर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे पाठविण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला. याप्रश्नावर लोणी-काळभोर ग्रामपंचायतीची मंगळवार, १७ मार्च रोजीची ग्रामसभा गावकऱ्यांच्या अपुऱ्या उपस्थितीमुळे कोणताही ठराव न घेता तहकूब करण्यात आली.

यावेळी बोलताना बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी एमआयटी प्रशासनाने विद्यार्थ्यांचा वापर करून आंदोलन घडवून आणले असून त्यांचेवर गुन्हे दाखल होवू नये म्हणून ग्रामस्थांनी संयम बाळगला. एमआयटीचा कचराही नदीपात्रात टाकण्यात येतो.

गावचा नदीपात्राकडे जात असलेला रस्ता गायब आहे. व संस्थेने ओढ्यावर अतिक्रमण केले आहे. असे म्हणाले. तर शिवसेनेचे रमेश भोसले यांनी एमआयटीची भुमिका आडमुठेपणाची असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत गवळी यांनी गांव अधी नंतर एमआयटी आली असून गांवच्या मालकीच्या रस्त्यावर नागरिकांना अडवले तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!