पुणे जिल्हा परिषदेत नवे नेतृत्व; अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील..


पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या वतीने दौंड तालुक्यातील वीरधवल जगदाळे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर उपाध्यक्षपदासाठी आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. काही वेळातच दोन्ही उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही पदे याच पक्षाकडे जाणे निश्चित मानले जात आहे. पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद ‘सर्वसाधारण’ गटासाठी आरक्षित असल्याने पक्षातील अनुभवी आणि ज्येष्ठ सदस्यांना संधी मिळणार की नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, बुधवारी सकाळी शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत अखेर या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुणे जिल्हा परिषदेला अखेर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.

दुपारी ३ वाजता विशेष सभेला सुरुवात होईल. यामध्ये उपस्थित सदस्यांना उमेदवारांचे अर्ज दाखवून त्यांची छाननी केली जाईल. छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी दिला जाईल. त्यानंतर अंतिम यादी जाहीर होईल. एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास ‘हात उंचावून’ मतदान घेतले जाईल. मात्र, केवळ एकच अर्ज आल्यास निवड बिनविरोध घोषित केली जाईल.

तसेच पवार कुटुंब यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्यानेच वीरधवल जगदाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या नेत्यांचे म्हणणे आहे. दौंड तालुक्याला अध्यक्षपदाचा मान दुसऱ्यांदा मिळाला असून, यापूर्वी वैशाली आबणे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या होत्या. अनेक वर्षांनंतर दौंड शहराला पुन्हा ‘लाल दिवा’ मिळाल्याने कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!