पुणे-नगर मार्गावर ‘या’ वाहनांना पुढील 5 दिवस बंदी, पुणे शहर वाहतूक शाखेचा निर्णय..

पुणे : पुण्यातील लोणीकंद परिसरात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने विशेष उपाययोजना केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर १८ ते २२ मार्च या कालावधीत दुपारी २ ते रात्री ११ या वेळेत लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.या बंदीत ट्रक, खासगी आराम बस, जेसीबी, रोड रोलर आणि ट्रॅक्टर यांसारख्या सर्व अवजड वाहनांचा समावेश आहे. तसेच, केवळ मुख्य मार्गावरच नव्हे तर परिसरातील उपरस्त्यांवरही अशी वाहने उभी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून ही उपाययोजना करण्यात आली असून, संबंधितांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र केसरीसारखी प्रतिष्ठेची स्पर्धा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लोणीकंद ते खराडी या मार्गावर वाहतूक सुरळीत राहावी आणि कुस्तीप्रेमींना वेळेत पोहोचता यावे, यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.
या पार्श्वभूमीवर अवजड वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनीही संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य वेळेचे नियोजन करूनच प्रवास करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.