मुंबईत भाजप आमदाराला दणका! थेट पीएम मोदींनीच दिले कारवाईचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर सरकारी भूखंड लाटल्याचा आणि कोट्यवधी रुपयांची स्टँप ड्युटी बुडवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे मेहता यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

अशातच आता नरेंद्र मेहता यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याची माहिती समोर येताच राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक घोटाळ्यांबाबत केंद्र सरकारची कठोर भूमिका या प्रकरणामुळे पुन्हा अधोरेखित झाली असल्याची चर्चा आहे.
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका पत्रात नरेंद्र मेहता यांचा ‘भूमाफिया’ असा उल्लेख झाल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळाले आहे.

मिरा-भाईंदरमधील आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर शेतकरी आणि आदिवासी समाजातील नागरिकांच्या जमिनी नाममात्र दरात खरेदी करून त्यांचा गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच भूखंड व्यवहारांमधून कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
या गैरव्यवहारांची रक्कम सुमारे 400 ते 500 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर त्याची दखल घेत थेट मुख्यमंत्री कार्यालयाला कारवाईचे निर्देश देण्यात आल्याचे समजते.
नरेंद्र मेहता हे ‘सेव्हन इलेव्हन’ कंपनीचे मालक असून या कंपनीमार्फत विविध जमीन व्यवहारांमध्ये अनियमितता केल्याचे आरोप आहेत. फ्लॅट विक्रीच्या नावाखाली फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल आहे. तसेच मिरारोड येथील कांदळवन क्षेत्रात ‘सेव्हन इलेव्हन क्लब’चे नियमबाह्य बांधकाम केल्याचा मुद्दा न्यायालयात गेला असून या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनी नोंदणी न करता कमी दरात खरेदी करून शासनाचा महसूल बुडवला आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली, असेही आरोप आहेत. ‘अपना घर’ प्रकल्पातील 79 कोटींच्या वाळू रॉयल्टी घोटाळ्यापासून ते मेट्रो उड्डाणपूल प्रकल्पातील खर्चवाढीपर्यंत विविध प्रकरणांमध्ये त्यांचे नाव पुढे आले आहे आणि काही प्रकरणांत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, नरेंद्र मेहता यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून थेट निर्देश आल्याने या प्रकरणाची चौकशी अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.