अवकाळीचा इशारा! गुढीपाडव्याला पावसाची हजेरी, राज्यात ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट…

पुणे : राज्याच्या काही भागात कडाक्याचं ऊन पडत असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट आहे. वेस्टर्न डिस्टरबन्सच्या एकामागून एक येणाऱ्या लाटांमुळे उत्तर भारतासह महाराष्ट्राच्या हवामानातही मोठा बदल होत आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्याच्या अनेक भागांत पावसाची हजेरी लागणार असून, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, १७ ते २० मार्च या कालावधीत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सोमवारी विदर्भातील वाशिममध्ये राज्यातील सर्वाधिक ४०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर दुसरीकडे पुण्यात रात्रीचा पारा १६.४ अंशांपर्यंत खाली आल्याने थंडावा जाणवला. मात्र, आता ढगाळ हवामानामुळे रात्रीच्या उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

गारपीट – बुधवारी (१८ मार्च) अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव आणि लातूरसह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर), सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.१८ मार्चपासून मुंबईसह कोकणात हलक्या सरी कोसळू शकतात. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.