कदमवाकवस्ती येथे पान ‘शॉप’वर पोलिसांचा छापा; दोघांना अटक; एक फरार, सुमारे २ लाखांचा अंमली पदार्थ जप्त…


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत रासरोजपणे विकल्या जाणाऱ्या नशा येणा-या पानाच्या दुकानात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंमली विरोधी पथक क्रमांक दोनने कदमवाकवस्ती येथील ‘मैफिल पान शॉप’वर अचानक छापा टाकून दोन जणांना अटक केली आहे. या कारवाईत 266.4 ग्रॅम अंमली पदार्थ मिश्रित पान, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा सुमारे 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी दुकान मालक निशांत दत्तात्रय काळभोर (वय 19, रा. बाजारमळा, लोणी काळभोर) व कामगार रामजी संतोष पटेल (वय 33, सध्या रा. कदमवाकवस्ती, मूळ रा. जि. बांदा, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. तर रोहित जवळकर (रा. लोणी काळभोर) हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपींविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ व सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंमली विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि मोबाईल ड्रग टेस्टिंग मशीनच्या सहाय्याने तपास केला असता खाण्याच्या पानामध्ये अ‍ॅम्फेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स आणि मेथाम्फेटामाइन या धोकादायक अंमली पदार्थांचे मिश्रण करून नशेली पाने विकली जात असल्याचे उघड झाले. या उघडकीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर परिसरातील अनेक पान टपऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र नागरिकांच्या मते, ही कारवाई खूप उशिरा झाली आहे.

पूर्व हवेली मध्ये सुमारे 200 हून अधिक ठिकाणी नशा देणारी पाने विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ही दुकाने पुणे–सोलापूर महामार्गालगत, चौकाचौकात तसेच हॉस्टेल, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तसेच गावातील चौकात बिनधास्त सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या पानाच्या आहारी जात असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

या नशेली पानाची किंमत साधारणपणे २० ते ३५ रुपये असून ते खाल्ल्यानंतर दारूच्या बाटलीइतकी नशा होत असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या पानाला दारू किंवा गुटख्यासारखा वास नसल्यामुळे पालकांना मुलांनी नशा केल्याचे लगेच लक्षात येत नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये नकळत तरुण पिढी व्यसनाच्या दलदलीत अडकत असल्याचे चित्र समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यसभा आणि विधानसभेतही नशेली पानाचा मुद्दा गाजला होता, तरीही स्थानिक प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने ठोस मोहीम राबवली नाही, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. परिणामी आज हा व्यवसाय अनेक ठिकाणी वाढला असून तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेत ढकलणारा हा धोकादायक प्रकार प्रशासनाच्या नजरेआड कसा राहिला? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या पानामुळे विद्यार्थ्यांमध्ये भांडणे, आरोग्याच्या समस्या आणि असामाजिक वर्तन वाढत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे केवळ एका दुकानावर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, तर पूर्व हवेलीतील सर्व नशेली पान विक्री केंद्रांवर व्यापक मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

“कदमवाकवस्तीतील ‘मैफिल पान हाऊस’वर छापा टाकून दुकानातील अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असून येथून पुढेही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.”

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!