लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत परिसरातील कचऱ्यावरून वाद, एमआयटीचे सुमारे ४ हजार विद्यार्थी उतरले रस्त्यावर; कचऱ्याच्या गाड्यांना प्रवेशबंदी…


लोणी काळभोर : येथील मुळा-मुठा नदीपात्रात लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत परिसरातील कचऱ्याच्या प्रश्नावरून वातावरण पुन्हा एकदा तापले असून एमआयटी परिसरातील कचऱ्याच्या दुर्गंधी, प्रदूषण आणि आरोग्याच्या धोक्यामुळे संतप्त झालेल्या हजारो विद्यार्थ्यांनी आज शुक्रवारी (१३ मार्च) रोजी सकाळी मोठे आंदोलन छेडले.

थेट रस्त्यावर उतरून कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांना प्रवेशबंदी केली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही ग्रामपंचायतींकडून नदीत टाकण्यात येणारा कचरा पेटला होता. यातुन निघालेल्या धुरामुळे या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता.

त्यामुळे कचऱ्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी यापूर्वीही आवाज उठवला होता. परंतु परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने विद्यार्थ्यांचा रोष पुन्हा उफाळून आला. आज सकाळी विद्यार्थ्यांनी एकत्र येत कचऱ्याच्या गाड्यांना एमआयटी परिसरात प्रवेश करू न देण्याचा निर्णय घेतला आणि रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले.

या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून धुरामुळे प्रदूषण वाढत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “परिसरात शिक्षणासाठी आलो असताना कचऱ्याच्या दुर्गंधीत आणि धुरात राहावे लागत आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला गेला पाहिजे,” अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर परिसरात तणावपूर्ण शांतता असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यामुळे वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले. प्रशासनाकडून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

कचरा प्रश्नावरून परिसरात यापूर्वीही अनेकदा वाद निर्माण झाले होते. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामपंचायती यांच्यातील हा वाद पुन्हा उफाळून आल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विद्यार्थ्यांनी मात्र “कचऱ्याची समस्या कायमची सोडवा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू,” असा इशारा दिल्याने पुढील काही तासांत परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!