भाजप- राष्ट्रवादीचा झाला गेम, ठाकरे-शिंदे एकत्र…राजकारणातून समोर आली मोठी घडामोड, कुठं झाली उलथापालथ?

पुणे : मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू आल्यानंतर शिवसेनेच्या एकत्रीकरणाची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक घडामोड घडली आहे.

महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपला डावलून जुन्नर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (ठाकरे) या दोन्ही गटांनी हातमिळवणी केली आहे. या ‘शिवसेना-शिवसेना’ युतीमुळे भाजप सत्तेपासून दूर राहिली असून, पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे.
जुन्नर पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने सत्ता कोणाची येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जुन्नर पंचायत समितीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे ८ सदस्य, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ६ सदस्य, भाजप आणि ठाकरे गटाचे प्रत्येकी एक सदस्य आहेत.

शिवसेना (शिंदे) गटाला सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ एका मताची गरज होती. सर्वांना वाटले होते की महायुतीचा धर्म पाळत ते भाजपची साथ घेतील, मात्र शिंदे गटाने थेट ठाकरे गटाच्या सदस्याला सोबत घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
दरम्यान, या नव्या युतीनुसार, सभापती पदावर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या कमल शेळकंदे यांची वर्णी लागली आहे. तर, उपसभापती पदासाठी शिंदे गटाने ठाकरे गटाला झुकते माप दिले असून, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे अमित ढोले यांची उपसभापती म्हणून निवड झाली आहे.