नागपूरच्या स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 15 मजुरांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी….

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एसबीएल कंपनीत सकाळी सात वाजताच्या सुमारास मोठा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. ह्या स्फोटात आगीची तीव्रता इतकी होती की 15 मजुरांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर 20 कामगार जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डिटोनेटर बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान कंपनीमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटाच्या भीषण आवाजाने परिसरात खळबळ उडाल्यानंतर जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले. मोठ्या प्रमाणात झालेल्या स्फोटानंतर परिसरात आग ही लागली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक विभागाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आल आहे. मात्र या स्फोटाचे नेमकं कारण काय अद्याप स्पष्ट झालेला नाही.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. पोलीस प्रशासन आणि बचाव पथके तातडीने पोहोचले असून, जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कंपनीत यापूर्वीही एसबीएल कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली होती, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या भीषण स्फोटानंतर कंपनीकडून सुरक्षितेबद्दल मोठे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमदार चरण सिंग ठाकूर यांनी केला आहे. तसेच प्रशिक्षणाशिवाय आणि कुठलीही आवश्यक ती काळजी न घेता कामगार वापरले जातात असा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.