माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडणूक लांबणीवर ; सुनेत्रा पवारांच्या निवडीवर पूर्णविराम?

बारामती : संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि बहुचर्चित अशा बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडणूक आता पुन्हा लांबणीवर पडली आहे. या कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची निवड निश्चित झाली होती. मात्र आता निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ती निवड पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन होते. त्यांच्या अपघाती निधनानंतर चेअरमन पदाची जागा रिक्त झालेली होती. त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड करण्याची जवळपास निश्चित झाले होते. मात्र ही निवड पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ते कारखाना कार्यस्थळावर येऊ शकणार नाहीत. त्यामुळे ही निवड पुढे ढकलण्यात आल्याचे संचालक मंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे.

संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील उपस्थित होत्या. मुख्य निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांची तब्येत बिघडल्याने ते उपस्थित राहू शकणार नाहीत असे सांगण्यात आल्याने चेअरमन पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली.यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्ष संगीता कोकरे,जेष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक,अशोक पाटील आदिसह बहुसंख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते.
या बहुचर्चित माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदाच्या निवडनिश्चितीकडे आता सर्व सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिल आहे.