राज्यात उन्हाचा तडाखा, पण ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, शेतकऱ्यांनो काळजी घ्या..

पुणे : सध्या राज्यात थंडी कमी झाली असून उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. अनेक भागांत दुपारच्या सत्रात कडक ऊन पडत असून तापमान झपाट्याने वाढले आहे. पुढील चार दिवस राज्यात प्रामुख्याने कोरडे वातावरण राहणार असले, तरी काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यामध्ये धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नाशिक, जळगाव तसेच पुणे जिल्ह्यातील काही भागांत ढगाळ वातावरण राहू शकते. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या सर्व विभागांत दिवस व रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. अनेक शहरांमध्ये कमाल तापमान 30 अंशांच्या पुढे गेले असून काही ठिकाणी ते 35 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले आहे.

किमान आणि कमाल तापमानात आणखी 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये विदर्भात उष्णतेचा प्रभाव जास्त असून अनेक ठिकाणी पारा 35 अंशांच्या पुढे सरकला आहे. पुण्यात (Pune Weather) किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात शहरात सरासरी 14.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
2014 नंतरची ही तिसरी उच्चांकी नोंद ठरली आहे. इतिहासात पाहता, 4 फेब्रुवारी 1967 रोजी 35.8 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले होते. मध्यम आणि उच्च स्तरावर ढगांची निर्मिती झाल्याने रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहत आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या सर्व विभागांत दिवस व रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.