गावपुढाऱ्यांनो लागा कामाला! ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले, २० फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेला सुरुवात, ४ मे ला अंतिम यादी…

पुणे : महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा, नगरपंचायत, महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्यातील हजारो ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे प्रभाग रचनेची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. यामुळे आता आगामी काळात गावगाड्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

पुणे जिल्ह्यात आगामी काळात ८७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, प्रभाग रचनेच्या कामाला वेग आला आहे. या प्रभाग रचनेचे वेळापत्रक समोर आले आहे. येत्या २० फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
त्यानंतर ७ एप्रिलला ग्रामपंचायतींच्या प्रभागांचे ‘प्रारूप’ प्रसिद्ध केले जाणार आहे. यानंतर ७ ते १३ एप्रिल या काळात नागरिक प्रभाग रचनेवर आपल्या हरकती आणि सूचना नोंदवू शकतील. मागील काही निवडणुकांमध्ये प्रभाग रचनेवरून अनेक वाद न्यायालयात गेले होते, त्यामुळे यावेळी प्रशासन अत्यंत पारदर्शकपणे काम करण्याचा प्रयत्न करत आहे.
या संदर्भातील अधिकृत आदेश ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी जारी केले आहेत. हरकती व सुनावणीची संधी ही प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नागरिकांना हरकती नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे. या कार्यक्रमानुसार ७ एप्रिल २०२६ रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होणार आहे. १३ एप्रिल २०२६ पर्यंत नागरिकांना हरकती नोंदवता येतील. २१ एप्रिल २०२६ पर्यंत उपविभागीय अधिकारी हरकतींवर सुनावणी घेतील.
लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ४ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. सर्व हरकतींचा विचार करून जिल्हाधिकारी २८ एप्रिल २०२६ पर्यंत प्रभाग रचना अंतिम करतील व ती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाईल. त्यानंतर ४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचना अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे.
दरम्यान, प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर गावागावांत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आरक्षण, भौगोलिक सीमा आणि लोकसंख्येच्या आधारे होणारी विभागणी यामुळे अनेक ठिकाणी नव्या नेतृत्वाला संधी मिळू शकते, तर काही ठिकाणी जुने समीकरण ढासळू शकते. एकूणच,राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले असून येत्या काही महिन्यांत ग्रामीण राजकारणात चुरस वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.