अजित पवार अमर रहे! अलोट जनसागराच्या उपस्थितीत अजित पवार अनंतात विलीन…; अख्खा महाराष्ट्र हळहळला

बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार अलोट जनसागराच्या उपस्थितीत अनंतात विलीन झाले. त्यांच्यावर बारामती मधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच लाडक्या दादांवर प्रेम करणारे लाखो कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक देखील उपस्थित होते.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व अजित पवार यांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्र देखील हळहळला.पार्थ पवार आणि जय पवार यांनी लाडक्या बाबांना अग्नी दिला. अंत्यसंस्काराच्या वेळी परिसरात शोकाकुल वातावरणात आक्रोश सुरू होता. त्यांना पोलिसांकडून मानवंदना दिली गेली. या दुखद प्रसंगी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा कंठ दाटून आला होता.
ज्या कणखर नेतृत्वाने राज्याला दिशा दिली ते शरीर पंचतत्वात विलीन होत असताना उपस्थित जनसमुदायाने’ अजित दादा अमर रहे…अजित दादा अमर रहे.. अशा घोषणा दिल्या. आपल्या पित्याचा हा अखेरचा प्रवास पाहताना दोन्ही पुत्रांना आपले अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या या अवस्थेने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच हृदय हेलावून गेले.

महाराष्ट्र शासनाचे वतीने पोलीस दलाने हवेत गोळीबाराच्या फेरी झाडून आणि बिगुल वाजवून अजित पवारांना अंतिम मानवंदना दिली. तिरंग्यात लपेटलेल्या आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत होत्या. एक कर्तबगार लोकनेता, खंबीर प्रशासक, कुटुंबाचा आधारस्तंभ असलेला हा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेल्याने महाराष्ट्र हळहळला.
या कठीण प्रसंगी अजित पवार यांच्या मातोश्री आणि पत्नी सुनेत्रा पवार यांची अवस्था अत्यंत हृदय द्रावक होती. आपल्या कुटुंबाचा भक्कम आधार आणि राज्याच्या राजकारणाचा कणा असलेला माणूस असा अचानक सोडून गेल्याने दोन्ही माऊली पूर्णतःखचल्या होत्या. सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना सावरून धरले.ज्या मातीने या नेत्याला घडवले त्याच मातीत त्यांना अखेरचा अलविदा देताना कुटुंबासह जन समुदायाला शोक अनावर झाला.
केवळ बारामतीच नव्हे तर आज अवघा महाराष्ट्र आपल्या या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी बारामतीत अवतारला होता. लाखो जनसमुदायाने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी जड अंतकरणाने अजित पवारांना अखेरचा निरोप दिला.
