प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यात काय फरक आहे? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व…

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन – नेमका फरक काय? भारत हा सण-उत्सवांनी समृद्ध देश आहे. यामध्ये दोन राष्ट्रीय सण विशेष महत्त्वाचे आहेत – १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन आणि २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन. अनेकांना या दोन दिवसांमधील नेमका फरक समजत नाही. तर आता आपण यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात…

तसेच स्वातंत्र्य दिन म्हणजे भारताला ब्रिटिश राजवटीतून मुक्ती मिळाल्याचा दिवस. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि आपल्याला स्वतःचा देश चालवण्याचा अधिकार मिळाला. हा दिवस स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचं आणि संघर्षाचं प्रतीक आहे. त्या दिवशी देशाने गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त होऊन नवा इतिहास रचला.
प्रजासत्ताक दिन मात्र भारताने स्वतःचं संविधान स्वीकारून पूर्ण सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळख मिळवलेल्या दिवसाचं प्रतीक आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि भारत “लोकशाही प्रजासत्ताक” देश बनला. म्हणजेच केवळ स्वातंत्र्य मिळालं नाही, तर देश चालवण्यासाठी ठोस कायदे आणि व्यवस्था अस्तित्वात आली.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित करतात. हा दिवस मुख्यतः स्वातंत्र्यलढ्यातील शौर्य, बलिदान आणि देशभक्तीचं स्मरण करून देतो. शाळा, कॉलेज, संस्था आणि गावागावात ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती कर्तव्य पथावर ध्वजारोहण करतात आणि भव्य परेड आयोजित होते. या परेडमधून भारताची लष्करी ताकद, सांस्कृतिक वैविध्य आणि राष्ट्रीय एकात्मता जगासमोर सादर केली जाते. विविध राज्यांच्या झांक्या आणि संरक्षण दलांची ताकद या दिवशी विशेष आकर्षण ठरते.
स्वातंत्र्य दिन म्हणजे गुलामगिरीतून मुक्तीचा उत्सव, तर प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधान, लोकशाही आणि कायद्याच्या अधिष्ठानावर उभ्या राहिलेल्या भारताचा गौरव. त्यामुळे दोन्ही दिवस राष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान राखून आहेत.
