‘यशवंत’ कारखाना तब्बल 15 वर्षांनंतर बँकेच्या ताब्यातून मुक्त; कारखाना सभासदांच्या मालकीचा होण्याचा मार्ग मोकळा; संचालक मंडळाला दोन वर्षानंतरचे मोठे यश….

उरुळीकांचन : हवेलीचे वैभव असलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना तब्बल 15 वर्षांच्या कालावधीनंतर बँकेच्या कस्टडीतून मुक्त होऊन सभासदांच्या ताब्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दिनांक 31 ऑगस्ट 2025 अखेर थकीत असलेले 54 कोटी 85 लाख रुपयांचे कर्ज, एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत 36 कोटी 50 लाख रुपयांमध्ये सेटल करून 30 सप्टेंबर 2025 रोजी भरणा करून फेडण्यात आले. अशी माहिती यशवंत कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर उंद्रे, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक कैलास जरे तसेच पंच बळीराम गावडे, संजय भोरडे यांच्या उपस्थितीत रीतसर कारखान्याचा ताबा कारखाना व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच राज्यातील बँकेच्या कस्टडीतून बाहेर पडलेला हा कदाचित एकमेव सहकारी साखर कारखाना असल्याचे मतही यावेळी अध्यक्ष जगताप यांनी व्यक्त केले.
यापुढे बोलताना जगताप म्हणाले, “सन 2010-11च्या गळीत हंगामापासून बंद असलेला हा कारखाना खऱ्या अर्थाने आता सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात आला असून, कारखाना पूर्ववत सुरू होईलही बाब सहकार क्षेत्रासाठी ऐतिहासिक यश मानली जात आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा, प्रामाणिक प्रयत्न आणि आर्थिक शिस्तीमुळे हे यश संपादन झाले. कारखान्याच्या संचालक मंडळाने सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम कारखान्याच्या परिसरातील अडचणी सोडवण्यावर भर देण्यात आला. योग्य नियोजन आणि काटेकोर आर्थिक व्यवस्थापनामुळे तब्बल 85 लाख रुपयांची बचत करण्यात यश आले.

2011 पासून अनेक शेतकऱ्यांचे ऊस बिल, कामगारांचे वेतन तसेच बँकांची देणी प्रलंबित होती. मात्र संचालक मंडळाने सभासद, कामगार आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत टप्प्याटप्प्याने ही देणी फेडण्याचे धोरण स्वीकारले. काही वेळा आर्थिक अडचणी असतानाही संचालक मंडळाने थेट सभासदांकडून निधी उभारून कामगारांचे पगार व आवश्यक खर्च भागवले.
या संपूर्ण प्रक्रियेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, उपसभापती शशिकांत गायकवाड, शिवाजीराव घुले यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. कारखान्यावर असलेले सुमारे 54 कोटी रुपयांचे ओझे कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान, शेतकरी, कामगार व शासकीय देणी अदा करून नवीन अत्याधुनिक साखर प्रकल्प, डिस्टिलरी प्रकल्प व सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू करून हवेली तालुक्यातील एकमेव श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार यावेळी संचालक मंडळ व सभासदांनी व्यक्त केला.
या बॅंकेची होती कर्ज…
बँक ऑफ इंडिया, थेऊर येथील 1 कोटी 30 लाख 69 हजार 316, स्टेट बँक ऑफ इंडिया, उरुळी कांचन येथील 7 कोटी 10 लाख 67 हजार 300 तसेच बँक ऑफ बरोडा, कुंजीरवाडी येथील 3 कोटी 75 लाख इतकी थकीत कर्जे होती. एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी भरून कारखाना सर्व बँकांच्या कर्जातून मुक्त करण्यात आला आहे.
21 हजार सभासदांसाठी ऐतिहासिक दिवस – उपाध्यक्ष किशोर उंद्रे
सद्याच्या संचालक मंडळाला सुमारे दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना, आज प्रत्यक्ष आपल्या मालकीच्या कारखान्यात बसण्याचा आनंद वेगळाच आहे. कारखाना आज खऱ्या अर्थाने 21 हजार सभासदांच्या मालकीचा झाला आहे. त्यामुळे सभासद शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि आनंदाचा ठरला आहे. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीने कारखान्यासोबत 99.27 एकर जमिनीचा व्यवहार केल्याने कारखान्याच्या आर्थिक पुनरुज्जीवनाला मोठा हातभार लागला. या संपूर्ण प्रक्रियेत हवेली तालुक्याचे नेतृत्व, बाजार समितीचे पदाधिकारी आणि संचालक मंडळाने एकत्रितपणे निर्णायक भूमिका बजावली.
आज कारखाना पूर्णपणे सभासदांच्या मालकीचा झाल्याने हवेली तालुक्यातील शेतकरी, कामगार व सहकार क्षेत्रात नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काळात कारखाना पूर्ववत सुरू करून आधुनिक प्रकल्पांच्या माध्यमातून पुन्हा वैभवशाली करण्याचा निर्धार यावेळी उंद्रे यांनी व्यक्त केला आहे.
