आता तू माझी पत्नी आहेस, बनावट लग्न अन् मुंबईच्या शाळकरी मुलीसोबत गडावर भयंकर घडलं, हादरवणारी माहिती आली समोर..

मुंबई : शाळकरी मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना वसई-विरार परिसरात घडली आहे. विरारच्या प्रसिद्ध जीवदानी मंदिरात नेऊन गळ्यात मंगळसूत्र बांधून आपले लग्न झाले आहे असा बनाव आरोपीने रचला.

त्यानंतर त्या आरोपीने पीडितेवर अत्याचार केले. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मुंबईची रहिवासी असून ती शालेय शिक्षण घेत आहे.
काही महिन्यांपूर्वी तिची ओळख एका सलूनमध्ये काम करणाऱ्या तरुणाशी झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. यानंतर आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेचे वय कमी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिला विरार येथील जीवदानी गडावर नेले.

त्यानंतर त्याने तिथे तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि मग त्यानंतर समाजमान्य पद्धतीने लग्न केल्याचा बनाव रचला. यानंतर त्याने आपण पती-पत्नी आहोत असे सांगत वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आहे.
दरम्यान, यानंतर १७ जानेवारी रोजी पीडित मुलगी शाळेत जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. ती वसई रेल्वे स्थानकावर आरोपीला भेटण्यासाठी आली होती. मात्र, स्थानकावर वावरताना तिचा वावर संशयास्पद वाटला. त्यामुळे सतर्क रेल्वे पोलिसांनी तिची विचारपूस केली. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. पण पोलिसांनी विश्वासात घेतल्यावर खरी माहिती समोर आली. यानंतर रेल्वे पोलिसांनी तात्काळ तिच्या पालकांशी संपर्क साधून तिला त्यांच्या स्वाधीन केले.
घरी परतल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पालकांनी याप्रकरणी नायगाव पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक करत असून सध्या आरोपीचा शोध सुरू आहे.
