कुख्यात गुंड गजा मारणेला हायकोर्टाचा दिलासा ; कडक अटी शर्तींसह ‘या’ तारखेला पुण्यात येणार, पोलिसांची करडी नजर

पुणे: पुणे महापालिका निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून गुंडांना आणि गुंडांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कुख्यात गुंड गजा मारणेला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.मारणेला येत्या १५ आणि १६ जानेवारी रोजी पुणे शहरात येण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. आपल्या पत्नीला निवडणुकीत मदत करण्यासाठी आणि मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आपल्याला शहरात येण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज गजा मारणेने मुंबई उच्च न्यायालयात केला होता. त्यानंतर आता न्यायालयाने यावर निर्णय घेत गजा मारणेला 15 आणि 16 जानेवारीला शहरात येण्याची परवानगी दिली आहे.

दरम्यान यापूर्वी स्थानिक सत्र न्यायालयाने मारणेला शहरात येण्यावर बंदी घातली होती. मात्र, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय अंशतः बदलत त्याला दोन दिवसांची मुदत दिली आहे. न्यायालयाने गजा मारणेला कडक अटी शर्ती घालून बाहेर येण्याची परवानगी दिली आहे.

न्यायालयाने गजा मारणे पुण्यात आला तरी त्याने मतदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा प्रभाव टाकू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तरी मारणेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची आणि तो निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करणार नाही, याची खबरदारी पोलीस प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.
पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातील गजा मारणे हे एक मोठं नाव आहे. त्याच्यावर ‘मकोका’सारख्या गंभीर कलमांखाली कारवाई झालेली आहे. अशा परिस्थितीत, निवडणुकीच्या दिवशी त्याच्या पुण्यातील उपस्थितीमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
