आजपासून शाळांना सुट्टी, वाढत्या उन्हामुळे प्रशासनाचा निर्णय..

पुणे : आजपासून राज्य मंडळाच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण व क्रीडा विभागाकडून असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सध्या राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे.

अनेक जिल्ह्यात 40 अंशाच्या पुढे तापमानाची नोंद झाली आहे. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेल्या शाळांचा अहवाल मागवला होता.
त्यानुसार वाढत्या उष्णतेच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला.

राज्यातील ज्या शाळांची परीक्षा संपली आहे त्यांना सुट्टी मिळणार आहे. राज्यातील शाळांना आजपासून सुट्टी सुरु होऊन ती 15 जूनपर्यंत असेल. विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा या 30 जूनपर्यंत बंद राहतील असं राज्य शासनाने जाहीर केलं आहे.
