नव्या वर्षात स्वस्तात घर खरेदीची सुवर्णसंधी! मुंबई, पुणे, ठाण्यात म्हाडाच्या घरांचा धमाका; लॉटरीची तारीख आणि अर्जाची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर…

पुणे : मुंबई, ठाणे, पुण्यात आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्यकाचं स्वप्न असतं. मात्र, घरांच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना या महानगरांमध्ये घर खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळेच म्हाडाच्या विविध मंडळांकडून अल्पदरात घरांची विक्री करण्यात येत असते.
मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या महागड्या शहरांमध्ये स्वतःचं घर घेणं सर्वसामान्यांसाठी अवघड ठरत असताना, म्हाडाकडून 2026 मध्ये स्वस्त दरात घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांचे घराचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
घरांच्या वाढत्या किमतींमुळे महानगरांमध्ये घर खरेदी करणे अनेकांसाठी अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत म्हाडाच्या घरांना मोठी मागणी असते. म्हाडाच्या विविध मंडळांकडून अल्प उत्पन्न, मध्यम उत्पन्न आणि उच्च उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिली जातात. ही घरे लॉटरी पद्धतीने किंवा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार विक्रीसाठी दिली जातात.

तसेच 2026 मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळ, कोकण मंडळ आणि पुणे मंडळाकडून घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई शहरासह ठाणे आणि पुणे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या लॉटरीमुळे महानगरांमध्ये स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.

सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे सध्या लॉटरी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. मात्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुंबई, कोकण आणि पुणे मंडळाकडून घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, म्हाडाने 2030 पर्यंत राज्यभर मोठ्या प्रमाणात घरबांधणीचे नियोजन केले आहे. एमएमआर ग्रोथ हब अंतर्गत सुमारे 8 लाख घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये कोकण मंडळाकडून जवळपास 2,000 घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. मुंबई मंडळातील लॉटरीत नेमकी किती घरे असतील, याबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही.
