पतीच्या निधनानंतर महिलेनं जीन्स घातली, चिडलेल्या सासू आणि दिराने केलं धक्कादायक कृत्य, घटनेने पुणे हादरलं..

पुणे : पतीच्या निधनानंतर विधवा महिलेने ‘जीन्स’ घातली या कारणावरून तिच्याच सासूने, दिराने आणि खुद्द जन्मदात्या मुलीने तिला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या हल्ल्यात पीडित महिलेचा हात मोडला असून परिसरात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना पुण्यातील सहकारनगर परिसरातून समोर आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, तळजाई वसाहत परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. ही महिला कचरावेचक म्हणून काम करून आपल्या चार मुलांचा सांभाळ करते.

दरम्यान,३० डिसेंबरच्या सायंकाळी ही महिला जीन्स घालून घराबाहेर उभी असताना, तिच्या सासूने (सविता) तिथे येऊन केवळ कपड्यांच्या कारणावरून तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सासूने सुनेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचे केस ओढून मारहाण केली. महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर तिची मोठी मुलगी तिथे आली.

मात्र आईला वाचवण्याऐवजी तिनेही मारहाण करण्यास सुरुवात केली. याच वेळी पीडितेच्या दिराने तिचा डावा हात जोरात पिरगळला, ज्यामुळे तिच्या मनगटाचे हाड मोडले. इतक्यावरच न थांबता आरोपींनी पीडितेच्या लहान मुलांनाही धक्काबुक्की केली आणि महिलेचा मोबाईल हिसकावून घेतला.
गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीत तिच्या हाताला ‘फ्रॅक्चर’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी सासू, दीर आणि मुलीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गंभीर दुखापत आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
