महापालिका निवडणुकीत कोणाच्या पाठीशी उभे राहायचं? मनोज जरांगे पाटलांनी केलं मोठं वक्तव्य…

नाशिक : मराठा समाजाचे आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक दौऱ्यात महापालिका निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.
याबाबत ते म्हणाले, समाजासाठी काम करणारे लोक राजकारणात टिकले पाहिजेत. आपल्या हातात थेट मते नसली तरी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम आपण करतो, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत थेट कुणाला पाठिंबा यापेक्षा समाजातील कार्यकर्त्यांना बळ देण्यावर त्यांनी भर दिला आहे.
समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते राजकारणात पुढे आले पाहिजेत. असे लोक टिकले तरच समाजाचा आवाज मजबूत होईल. असेही ते म्हणाले. समाजाने देखील अशा कार्यकर्त्यांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यामुळे याचा निवडणुकीत काय परिणाम होणार हे लवकरच समजेल.

तसेच ते म्हणाले, माझ्या हातात मते नाहीत, पण समाजाला मी आवाहन करू शकतो, असे सांगत त्यांनी समाजाच्या एकजुटीवर भर दिला. आजचे व्यासपीठ राजकीय नसले तरी समाजहितासाठी आपली भूमिका मांडणे आवश्यक होते, असेही त्यांनी सांगितले आहे, नाशिकमध्ये ते बोलत होते.

दरम्यान, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण नेहमी उभे राहतो, ही आपली भूमिका कायम असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले. सध्या राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
