सोशल मीडियावर मैत्री, तरुणासाठी पुण्यातील मुलीनं घर सोडून गाठलं कोल्हापूर, अन् नंतर घडलं भयंकर..

पुणे : फसवणुकीच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरील मैत्रीच्या जाळ्यात अडकून पुण्याहून कोल्हापुरात आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीला कोल्हापूरकरांच्या जागरूकतेमुळे मोठी मदत मिळली आहे.
‘ऑनलाइन’ मित्राने चुकीचा पत्ता देऊन तिची फसवणूक केली होती. कोल्हापूरच्या तरुणांचे प्रसंगावधान आणि शाहूपुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे या तरुणीवरील मोठे संकट टळले असून ती सुखरूप आपल्या कुटुंबाकडे परतली आहे.
नेमकं काय घडलं?

पुण्यातील ही तरुणी सोशल मीडियावरून झालेल्या एका ओळखीपोटी घर सोडून कोल्हापुरात आली होती. संबंधित मित्राने तिला कोल्हापुरात भेटीसाठी बोलावले होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून तो तिला चुकीचे पत्ते देऊन तिची फिरवाफिरव करत होता.

मंगळवारी दुपारी तो तिला कसबा बावड्यातील एका ठिकाणी भेटणार होता. मात्र तासनतास वाट पाहूनही तो न आल्याने ही तरुणी नैराश्यातून पाटील गल्लीच्या कोपऱ्यावर रडत बसली होती. तिच्याकडे ना पैसे होते, ना संपर्क साधण्यासाठी मोबाईल.
हताश अवस्थेत बसलेल्या या तरुणीला पाहून स्थानिक तरुण टिपू मुजावर आणि ओंकार पाटील यांना शंका आली. त्यांनी तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली. सुरुवातीला घाबरलेल्या या तरुणीचा विश्वास संपादन केल्यानंतर तिने आपली आपबिती सांगितली.
मित्राने फसवणूक केल्याचे लक्षात येताच या तरुणांनी तिला आधार दिला आणि तिच्या आईशी संपर्क साधून तिला धीर दिला. तरुणांनी या घटनेची कल्पना शाहूपुरी पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणीला ताब्यात घेतले.
तिचे योग्य समुपदेशन करून तिला अन्नाची आणि चहाची व्यवस्था केली. दरम्यान, पुणे पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा तरुणीचे नातेवाईक कोल्हापुरात पोहोचले आणि रीतसर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
