एका दिवसात राष्ट्रवादीतून भाजपात अन् 24 तासातच नगरसेवकपद, लॉटरी लागल्याने निष्ठावंत बघतच राहिले…

धुळे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. काल अर्ज दाखल केल्यानंतर आज अर्जांची छाननी सुरु आहे. काल राज्यभरात अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला. यामुळे मोठा राडा बघायला मिळाला.

तिकिटाची अपेक्षा असताना अनेकांच्या पदरी निराशा पडली. वर्षानुवर्षे पक्षाचं काम इमानइतबारे करुनही निष्ठावंतांना तिकीट मिळालं नाही. तर दुसरीकडे आयारामांनी मागून येऊन बाजी मारली. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी देखील झाली.

असे असताना धुळ्यात भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एका महिलेनं अवघ्या २४ तासांत नगरसेवकपद मिळवलं आहे. यामुळे राज्यात याची चर्चा सुरू झाली आहे. धुळे महापालिका निवडणुकीत उज्ज्वला भोसले यांनी अखेरच्या क्षणी भाजपमध्ये प्रवेश केला. उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं.

त्यानंतर उज्ज्वला भोसले यांना भाजपने तिकीट दिले. त्यांच्या विरोधात चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पण नंतर झालेल्या छाननी प्रक्रियेत त्यांचे अर्ज बाद झाले. यामुळे त्यांचा विजय सोपा झाला. काल भाजपमध्ये गेलेल्या भोसले आज नगरसेविका झाल्या. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून आनंद व्यक्त केला.
दरम्यान, धुळे महानगरपालिकेतील पहिल्या नगरसेविका होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. काल पक्षप्रवेश आणि आज नगरसेविका होण्याचा वेगळाच विक्रम त्यांच्या नावावर झाला आहे. यामुळे अनेकांची निराशा झाली तर काहींनी जल्लोष साजरा केला.
