पुण्यात कार-दुचाकीची भीषण धडक ; मद्यधुंद चालकाने दुचाकीस्वाराला उडवलं, मायलेकाचा मृत्यू

पुणे : सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र तयारी केली जात असताना पुण्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला धक्कादायक घटना घडली आहे.भोर – पुणे मार्गावर कार आणि दुचाकीची जोरात धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील माय लेकांचा मृत्यू झाला आहे. मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या चालकाने दुचाकीस्वाराला जोरदार उडवलं. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नंदा लक्ष्मण धावले आणि अमृत लक्ष्मण धावले असं अपघातात मृत्यू झालेल्या आई आणि मुलाचं नाव आहे. हे दोघेही मायलेक दुपारी शेतात जाण्यासाठी निघाले होते.शेतात जात असताना भोर – पुणे मार्गावरील कासुर्डी गावाच्या हद्दीत समोर येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आणि नंदा आणि त्यांचा मुलगा अमृत या दोघांनाही तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातावेळी अपघात झालेल्या कारमधील चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी भोरच्या राजगड पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

