फुरसुंगी येथे जुन्या वादाच्या कारणावरून डोक्यात दगडाने अन् लोखंडी रॉडने मारहाण करत तरुणाचा खून, तिघांना अटक…

लोणी काळभोर : फुरसुंगी पोलीस ठाण्याचे हद्दीत जुन्या वादाच्या कारणावरून पाच जणांनी एकाच्या डोक्यात दगडाने व लोखंडी रॉडने मारहाण करून जिवे ठार मारले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे.

फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत प्रसाद वीरभद्र देवज्ञ (वय २१ रा. चिखले यांचा वाडा, नंदुरवेस गल्ली, परळी वैजनाथ, जिल्हा बीड) या तरुणाचा खून झाला आहे. या प्रकरणी राहुल राजेंद्र सुतार (वय २५, रा. संतोषी माता कॉलनी लेन नंबर ३

ड्रीम्स आकृती काळेपडळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण भैरू चव्हाण (वय ३८), रोहित भरत गायकवाड (वय १९, दोघे रा. लेन नंबर १७, संकेत विहार, फुरसुंगी, पुणे) व १७ वर्षे वयाच्या एका विधी संघर्ष बालकास अटक करण्यात आली आहे.

या घटनेची सविस्तर हकिकत अशी की ३० डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारांस परी सुपर मार्केट संतोषी माता कॉलनी, लेन नंबर ३, ड्रीम आकृती, काळेपडळ, पुणे येथे यातील आरोपी किरण भैरू चव्हाण, टिल्लू मिसाळ, आदित्य देशमुख, रोहित गायकवाड, व टिल्लू मिसाळ यांचा मित्र गणेश (त्याचे नाव पूर्ण माहित नाही) यांनी जुन्या वादाच्या कारणावरून प्रसाद वीरभद्र देवज्ञ याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बांबूने मारहाण करून जबरदस्तीने टिल्लू मिसाळ याच्या गाडीत बसून त्याला संकेत विहार लेन नंबर १६, फुरसुंगी येथील गणपतीच्या मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नेऊन त्याच्या डोक्यात दगडाने व लोखंडी रोडने मारहाण केली. या मारहाणीत प्रसाद गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.पऱतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तो मयत झाला असल्याचे जाहीर केले.
सदरबाबत गुन्हा दाखल होताच फुरसुंगी पोलिसांनी तात्काळ हलचाल करून तिघांना अटक केली आहे. उर्वरित दोन फरार आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६ पुणे शहर डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नितीन पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे करत आहेत.
