शिवसेना ठाकरे गटाला धक्का! आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा घेतला मोठा निर्णय, पक्षात खळबळ, नेमकं काय घडलं?

मुंबई : राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर होती. त्यामुळे ज्या उमेदवारांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली आहे अशा उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.

तसेच अनेक इच्छुक उमेदवारांनी तिकीट न मिळाल्यामुळे बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अनेक पक्षांचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता आहे. अशातच आता मुंबईत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयाने बंडखोरी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवसेवा ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीकडे लागलेले आहे. अशातच आता मुंबईतील मालाड दिंडोशीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय व आमदार सुनील प्रभू यांच्या मतदार संघातील युवासेना सहसचिव यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढला आहे.

मालाडमधील प्रभाग क्रमांक 43 हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला होता. मात्र शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युतीमध्ये प्रभाग क्रमांक 43 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला गेल्यामुळे समृद्ध शिर्के हे नाराज होते.
प्रभाग 43 मधून निवडणूक लढण्यासाठी पक्षाकडून तयारीचा आदेश त्यांना आला होता, मात्र ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला गेल्यामुळे समृद्ध शिर्के यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. मात्र समृद्ध शिर्के यांच्याशी चर्चा करून त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे.
