लोणी काळभोर येथे बिबट्याकडून वासराचा फडशा; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण…

लोणी काळभोर : गोठ्यात दावणीला बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बाजार मळा परिसरात ही घटना घडली आहे. ही बुधवारी (ता.३१) सकाळी उघडकीस आली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे ५० हजाराहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. तर बिबट्याच्या लोणी काळभोर परिसरात वावर असल्याचे आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अमृत विठ्ठल काळभोर असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नावे आहेत. अमृत काळभोर हे एक शेतकरी असून ते कुटुंबासोबत लोणी काळभोर परिसरात राहतात. त्यांचा बाजारमळा जिल्हा परिषद शाळेच्या जवळ गायींचा गोठा आहे.

काळभोर यांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री गोठ्यात जनावरे बांधली होती. रात्री दहा वाजता काळभोर कामे आटोपून घरी गेले होते. दरम्यान, मंगळवारी (ता. ३०) बिबट्याने सहा फुट भिंतीवरून गोठ्यात प्रवेश केला. आणि दावणीला बांधलेल्या वासरावर हल्ला केला. परंतु, रस्सी न तुटल्याने बिबट्याला वासरू घेऊन जाता आले नाही.

पण या हल्ल्यात वासरू जाग्यावरच मृत्युमुखी पडले. आणि काळभोर हे बुधवारी सकाळी गोठ्यात गेले तेव्हा त्यांना वासरू मृतअवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल महेंद्र अगळे व तुळशीदास जाधव हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेची माहिती त्वरित वनविभागाला दिली आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण..
बिबट्याचे पायांचे ठसे नागरिकांना आढळून आले आहेत. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातच या वासराचा मृत्यू झाला आहे. अशी नागरिकांना खात्री पटली आहे. आपल्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
