पुरंदर विमानतळासाठी ६ हजार कोटी कर्ज, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावाची शक्यता..

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी सुमारे ६ हजार कोटी रुपये लागणार असून, यासाठी राज्य सरकार आता कर्ज उभारण्याच्या तयारीत आहे. हे कर्ज हुडकोकड़ून घेण्याचा विचार असून, मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
तसेच जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये हे विमानतळ प्रस्तावित असून, त्यासाठी सुमारे 3 हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने भूसंपादनासाठी अंदाजे 5 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता.
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच शेतकऱ्यांशी चर्चा करताना जमिनीचा वाढीव एकरी दर देण्यासह परताव्यापोटी देण्यात येणाऱ्या 10 टक्के रकमऐवजी वाढीव जमीन देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भूसंपादनाचा खर्च सुमारे एक हजार कोटी रुपयांनी वाढून 6 हजार कोटी रुपयांवर गेला आहे.

दरम्यान, या वाढीव खर्चासाठी राज्य सरकारने कर्ज उभारण्याचा निर्णय घेतला असून, मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर प्रस्ताव हुडकोकडे पाठविण्यात येणार आहे. कर्ज मंजूर झाल्यानंतर साधारण पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. मोबदला वितरित झाल्यानंतरच प्रत्यक्ष भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

