कुख्यात गुंडाच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी, कोण आहेत? कुठून लढणार निवडणूक?

पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक यंदा तिरंगी होणार असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. अशातच आता आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी एबी फॉर्मचं वाटप सुरू असून अजितदादांच्या भेटीसाठी जिजाऊ निवासस्थानी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.
रुपाली ठोंबरे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह अनेक नेते देखील जिजाऊवर अजित पवारांच्या भेटीसाठी आले. अशातच आता अजितदादा गटाने कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जयश्री मारणेला एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. जयश्री मारणे प्रभाग क्रमांक 10 मधुन निवडणूक लढणार हे स्पष्ट आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गजा मारणेच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने अनेकांना धक्का बसला. दुसरीकडे गुंड आंदेकरही निवडणुकीच्या मैदानात उतरले. गजा मारणे सध्या तुरूंगात असून त्याची पत्नी थेट महापालिका निवडणूक लढवत आहे.

दरम्यान, कोथरूडमध्ये दुचाकीस्वाराला मारहाण केल्याच्या प्रकरणात मारणे कारागृहात आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये काम पाहणाऱ्या व्यक्तीस मारहाण झाली होती. मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करण्याऱ्या व्यक्तीला गजा मारणे याच्या टोळीकडून बेदम मारहाण झाली होती. मारहाण करणारे आरोपी जामिनावर सुटल्याची माहिती होते, त्यानंतर गजा मारणे टोळीविरोधात मुरलीधर मोहोल मैदानात उतरले होते.

दरम्यान, रुपाली ठोंबरे पाटील यांना दोन एबी फॉर्म दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुपाली ठोंबरे पाटील आणि रूपाची चाकणकर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. रूपाली चाकणकर यांच्यावर गंंभीर आरोप करताना रूपाली पाटील दिसल्या. त्यानंतर त्यांनी अजित पवारांची भेट देखील या वादादरम्यान घेतली होती. आता रुपाली ठोंबरे पाटील यांना दोन एबी फॉर्म पक्षाकडून देण्यात आली.
