अष्टापुर येथे बिबट्या अखेर जेरबंद; वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या आढळला; नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास….

उरुळी कांचन : अष्टापुर (खोलशेत वस्ती) येथे (ता.३०) रोजी पहाटे बिबट्या जेरबंद करण्यात आले आहे. सुरेश राजाराम कोतवाल यांच्या गट नंबर 413 मध्ये वनविभागामार्फत पिंजरा लावण्यात आला होता. याच पिंजऱ्यात बिबट्या अडकून पकडला गेल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
यापूर्वी ९ डिसेंबरला पहाटे अंजना वाल्मिक कोतवाल यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. या घटनेनंतर तातडीने वनविभागाला माहिती देण्यात आली.
परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर पिंजरे लावावेत व शासकीय मदत मिळावी, यासाठी आमदार ज्ञानेश्वर कटके व श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, खोलशेत वस्तीतील ग्रामस्थ तसेच सर्व अष्टापुर ग्रामस्थांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे सातत्याने विनंती केली होती.

या मागणीची दखल घेत वनविभागाने परिसरात एकूण चार पिंजरे लावले होते. अखेर आज त्यापैकी एका पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याने या प्रयत्नांना यश आले आहे.या यशस्वी कारवाईबद्दल वनविभाग अधिकारी राज वरक रासकर, सकपाळ व बाजारे यांच्या कार्याचे सर्व खोलशेत (अष्टापुर) ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.

