नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय, राज ठाकरेंचं मोठं विधान…

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युती करण्याची भूमिका स्पष्ट करत जागा वाटपावर सूचक वक्तव्य केले.
यावेळी राज ठाकरे यांनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला. भाजप सध्या नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जोरावर माज करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेविना राहण्याचे प्रसंग देशाच्या इतिहासात अनेकदा आले असून, सत्तेत नसतानाही मनसेचा दबदबा कमी झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये गेल्यास फायदा होईल असे अनेकांना वाटत असल्याची टीका करत, भाजपमधील अनेक लोकांवर टांगती तलवार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. प्रचारसभांमध्ये आपण अनेक गोष्टी उघड करणार असल्याचे संकेत देत, ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मुंबई आपल्या हातात ठेवायचीच, असा निर्धार त्यांनी मनसैनिकांना करून दिला. येत्या काही तासांत उमेदवारी अर्ज दाखल होत असताना सर्वांनी उत्साहाने आणि एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राज ठाकरे यांनी मुंबईत मनसेच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधत ही निवडणूक आपल्या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे स्पष्ट केले आहे.राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

मतभेद, नाराजी आणि वैयक्तिक स्वार्थ बाजूला सारून प्रत्येकाने निवडणुकीत झोकून देऊन काम करावे, असा स्पष्ट आदेश त्यांनी मनसैनिकांना दिला. मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक मनसेसाठी निर्णायक ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
