पुण्यातील तिढा सुटेना ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मविआच्या बैठकीला दांडी, पडद्यामागे मोठ्या घडामोडी

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात असताना युतीची चर्चा फिस्कटली आहे. अशातच आता महाविकास आघाडीची आज नियोजित बैठक होती. तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी बैठकीला आलेले नाहीत. त्यांनी बैठकीला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

आगामी पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवार यांच्यासोबत बैठक फिस्कटल्यानंतर गेल्या दोन दिवसात शरद पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी हे महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावत होते. मात्र कालपासून अचानकपणे शरद पवार यांच्या पक्षातील कोणतेही पदाधिकारी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत बैठकीला उपस्थित राहत नाहीत.त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने वेगळे लढण्याची भूमिका घेतली.

या निवडणुकीसाठी आता मनसे सोबत येते का, याचीही चाचपणी केली. तसेच यापुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बैठकीला बोलवायचे नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे.

दुसरीकडे काँग्रेसच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत सुरू असलेल्या बैठकीला काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रशांत जगताप हेही उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत काहीसे अस्वस्थ पाहायला मिळाले.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जायचे की महाविकास आघाडी सोबत राहायचे अशी द्विधा मनस्थिती सध्या शरद पवार यांच्या पक्षाची झालेली आहे.
