महायुतीत दोस्तीत कुस्ती? एकनाथ शिंदेचा भाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, उमेदवारीही निश्चित

मुंबई : राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना आता महायुती ठिणगी पडली आहे.महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाचे आशिष माने यांना फोडून त्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब केले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी अवघे 48 तास शिल्लक राहिलेले असताना मुंबईत महायुतीत दोस्तीत कुस्तीला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या भाच्याला राष्ट्रवादीने प्रवेश दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेहुणीचा मुलगा म्हणजेच त्यांचा भाचा आशिष माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत आशिष माने यांचा प्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आशिष माने यांना चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५९ मधून उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

मुंबईत महायुतीचे काय होणार, कोण किती जागांवर लढणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची २० ते २५ जागांची मागणी आहे. परंतु राष्ट्रवादी जर नवाब मलिक यांच्या नेतृत्वात लढली तर त्यांना युतीत घेण्यास भाजपचा विरोध असल्याने आता शिंदेसेना आणि भाजपची युती झाली आहे. पुढच्या २४ तासांत कोण किती जागांवर आणि कोणत्या जागांवर लढणार, हे स्पष्ट होणार आहे.
तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या माजी महामंत्र्याला देखील राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याचे ठरविले आहे. निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडी आणि पक्ष प्रवेशांच्या घडामोडीला वेग आला आहे.शिंदे यांच्या मेहुणीचा मुलगा राष्ट्रवादीत आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
