दरवाढीचा भडका! २४ तासात सोनं ₹१९०० तर चांदी २३००० महागली, ग्राहकांना झटका

पुणे :गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात येत आहे. मुंबई, पुण्यापासून दिल्ली अन् चेन्नई कोलकात्यामध्ये सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. सुवर्णनगरी जळगावात सोने-चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. अवघ्या २४ तासांत सोनं ₹१,९०० तर चांदी ₹२३,००० ने महागली आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि लग्नसराईमुळे सोन्या चांदीची दरवाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महाराष्ट्रातील सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात सोन्याची किंमत २४ तासात १,९०० रूपयांनी वाढली आहे. तर चांदी तब्बल २३ हजारांची वाढली आहे. या वाढीनंतर ग्राहकांच्या खिशाला चाप बसला आहे.

सोने-चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. एका दिवसात सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅममागे एक हजार ९०० रुपयांची, तर चांदीच्या भावात प्रति किलोमागे २३ हजारांची (विनाजीएसटी) वाढ झाली. एकाच दिवसातील भाववाढीने खरेदीरांना चांगला झटका बसला आहे.

लग्नसराई, सणासुदीची खरेदी आणि गुंतवणूक, म्हणून सोन्याला असलेले पारंपरिक महत्त्व आहे. यामुळेही देशांतर्गत मागणी मजबूत राहण्याची शक्यता आहे. जागतिक राजकीय तणाव, फेडरल रिझर्व्हच्या धोरणांची अनिश्चितता, वाढती औद्योगिक मागणी आणि मर्यादित पुरवठा या सर्व कारणांमुळे सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे.
