ठाण्यात राजकीय घडामोडी; काल मीनाक्षी शिंदेचां तडकाफडकी राजीनामा, आज शिंदेंचा फोन येताच बंडखोरीतुन माघार

मुंबई :आगामी महापालिका निवडणुका तोंडावर असताना ठाण्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.काल ठाणे शहराच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी विश्वासू पदाधिकाऱ्यावर पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केल्याने तडकाफडकी राजीनामा दिला होता.मात्र एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संपर्क साधून चर्चा केल्यानंतर मिनाक्षी शिंदे यांनी बंडाची तलवार म्यान केली आहे.

शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून पक्ष विरोधी काम केल्याबद्दल, विक्रांत वायचळ शाखाप्रमुख निर्मल आनंदनगर (मनोरमा नगर) ठाणे, यांना काही दिवसांपूर्वी शाखाप्रमुख पदावरून निलंबित करण्यात आले होते. वायचळ हे मिनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याच कारणातून कलह होऊन मिनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली.

मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीनाक्षी शिंदे यांना फोन लावून त्यांची मनधरणी केली.मिनाक्षी शिंदे यांचा दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या त्यांच्या चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून घडलेल्या घडामोडींची माहिती घेतली. तसेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच येत नाही. पक्ष सोडण्याचा निर्णय माझ्या मनातही येणार नाही. एका घडामोडीमुळे मी प्रचंड दु:खी झाले होते. मात्र पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी स्वत: लक्ष घालून घडलेल्या घटनेची माहिती घेतली, असे मिनाक्षी शिंदे म्हणाल्या.
