हवेली तालुक्यातील २२ सायकलपटुंची दहा दिवसात सुमारे १ हजार ६१० किलोमीटरचा प्रवास करून गाठले जगन्नाथ पुरी..


लोणी काळभोर : एखादे ध्येय साध्य करावयाचे असेल यांसाठी आपल्यात उत्साह ध्यास आणि जगात बदल घडविण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. हे हवेली तालुक्यातील २२ सायकलपटुंनी सिद्ध करून दाखविले आहे.

पुणे ते ओडिशातील श्री जगन्नाथ पुरी मंदिरापर्यंतची सुमारे १ हजार ६१० किलोमीटरचा अवघड प्रवास फक्त दहा दिवसात यशस्वीरीत्या पूर्ण करून ही किमया साध्य केली आहे. यामुळे सह्याद्री सायकल रायडर्सच्या सायकलपटूंचे पुणे जिल्ह्यातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सह्याद्री सायकल रायडर्सचे सायकलपटू हे कदमवाकवस्ती. शेवाळवडी व हडपसर परिसरातील आहेत. या २२ जणांच्या सायकलपट्टूनी पुणे ते ओडिशातील श्री जगन्नाथ पुरी मंदिरापर्यंत सायकलवारी करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार ते पुण्यातून १३ डिसेंबरला निघाले होते. पुणे, सोलापूर, बसवकल्याण, हैद्राबाद, खम्मम, देवरपल्ली, पिठापुरम, विशाखापट्टणम, कासीबुगा, चिल्का असा प्रवास करत २२ डिसेंबर रोजी हे सर्व सायकलपटू श्री जगन्नाथ पुरी येथे पोहोचले.

       

यामध्ये गिरीश कुलकर्णी, चेतन कोठावडे, महेंद्र भिंडे, युवराज दळवी, योगेश सातव, संदीप डफळ, पूनम रणदिवे, ऋषिकेश पाटील, उमेश टकले, राजकुमार देमान्ना, तेजस फाटक, सुनील बलकवडे, स्नेहल शिनगारे, आनंद देशपांडे, योगेश बिडकर, श्रीकांत तांगुंदे, अश्विन जोगदेव, संदीप म्हस्के, शिवाजी काळे, सुनील दिवे व पंकज जोशी हे सायकलपट्टू सहभागी झाले होते.

या दहा दिवसांच्या प्रवासादरम्यान त्यांनी पिठापुरम येथील श्री वल्लभ विठ्ठल मंदिर, श्री सत्यनारायण मंदिर यांसह अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊन दर्शन घेतले. पाच राज्यांतून करण्यात आलेल्या या दीर्घ व आव्हानात्मक प्रवासादरम्यान सर्व सायकलपटूंनी एकमेकांची विशेष काळजी घेत शिस्तबद्धता, संयम आणि संघभावना जपत हा उपक्रम यशस्वी केला. श्री जगन्नाथ पुरी येथे पोहोचल्यानंतर सर्व सायकलपटूंनी प्रभू जगन्नाथाचे दर्शन घेत आनंद व समाधान व्यक्त केले.

या मोहिमेत सहभागी झालेले हवेली तालुक्यातील २२ सायकलपटू विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या सर्वांची एकमेकांशी मैत्री आहे. त्यांनी अवघ्या १० दिवसात १ हजार ६१० किलोमीटर अंतर सायकलवरून पार केले आहे. दररोज त्यांनी जवळपास १६० किलोमीटर अंतर पूर्ण करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे या सायकलपटूंचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. तसेच त्यांच्यावर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!