झटपट पटापट! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी डॉक्टर बायकोशी वाजलं, २४ तासात भांडण अन् घटस्फोट, पुण्यात ऐतिहासिक काडीमोड..

पुणे : लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून सुरू झालेल्या वादामुळे हे दाम्पत्य विभक्त झाल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. . विशेष म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन अवघ्या ८ दिवसांत त्यांना घटस्फोट मंजूर करण्यात आला.

पुणे कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. घटस्फोट झालेले हे दाम्पत्य समाजातील प्रतिष्ठित वर्गातील आहे. पती एका जहाजावर (शिप) मोठ्या पदावर कार्यरत आहे, तर पत्नी व्यवसायाने डॉक्टर आहे.

मोठ्या अपेक्षेने या दोघांनी १८ महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या २४ तासांत पतीच्या कामाच्या स्वरुपावरुन नवरा-बायको दोघांमध्ये खटके उडू लागले. वादाची ठिणगी इतकी मोठी होती की, लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

३ डिसेंबर रोजी या जोडीने वकील अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांच्यामार्फत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. सामान्यतः घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी अनिवार्य असतो, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार, जर पती-पत्नी १८ महिन्यांपेक्षा जास्त काळ विभक्त राहत असतील, तर हा कालावधी शिथिल केला जाऊ शकतो.
हे दाम्पत्य दीड वर्षांपासून वेगळे राहत असल्यामुळे आणि पतीला तातडीने नोकरीसाठी परदेशी जाणे आवश्यक असल्याने न्यायालयाने १० डिसेंबर रोजी घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले.वाढत्या घटस्फोटांच्या पार्श्वभूमीवर अगदी क्षुल्लक कारणांवरून सुखी संसाराला लागलेली ही गळती सध्या चिंतेचा विषय ठरत आहे.
