पुण्यात मध्यरात्री दोन्ही राष्ट्रवादींची हायव्होल्टेज बैठक, काका-पुतण्या एकत्र येणार? कशावर चर्चा?

पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या असताना आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मध्यरात्री गुप्त बैठक पार पडल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यात मध्यरात्री झालेल्या या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर प्राथमिक स्तरावर एकमत झाल्याची चर्चा रंगली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ‘अजित पवार यांच्या सूचनेनंतरच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत प्रामुख्याने जागा वाटपाचा तिढा सोडवण्यावर चर्चा झाली असून तो लवकरच मार्गी लागेल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान या बैठकीला शरद पवार गटाकडून खासदार अमोल कोल्हे , आमदार रोहित पवार आणि शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित होते. तर अजित पवार गटाकडून अजित गव्हाणे हे सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान दोन्ही पक्षांचे उमेदवार जिंकू शकतील, अशाच जागांवर उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी या बैठकीबाबत फारसे बोलण टाळलं. ‘ही फक्त मैत्रीपूर्ण बैठक होती,’ असं सांगत त्यांनी राजकीय चर्चेवर मौन बाळगलं. मात्र, ‘राजकारणात काहीही होऊ शकतं,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.
