सावधान! नायलॉन मांजा वापरल्यास पालकांनाही होणार ‘इतक्या’ हजारांचा दंड, हायकोर्ट अॅक्शन मोडमध्ये….

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत नायलॉन मांजामुळे अनेक अपघात घडले असून नागरिकांना गंभीर दुखापती झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाच्या वापराविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर नागपूर उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणात यापूर्वीही विविध आदेश पारित केले होते. मात्र, त्यानंतरही नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर मोठ्या आर्थिक दंडाची कारवाई करण्याचा प्रस्ताव न्यायालयासमोर ठेवण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने प्रस्तावित केलेल्या शिक्षेनुसार, जर एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळला, तर त्याच्या पालकांना 50 हजार रुपये दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. तसेच, एखादी प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास तिलाही 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा प्रस्ताव आहे.

दरम्यान, न्यायालयाने याबाबत स्पष्ट शब्दांत भूमिका घेतली असून, नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांवर कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा कठोर शिक्षेची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
जर एखाद्या विक्रेत्याकडे नायलॉन मांजाचा साठा आढळून आला, तर त्या दुकानदाराकडून अडीच लाख रुपये दंड वसूल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावित शिक्षांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने 5 जानेवारी 2026 रोजी सुनावणी निश्चित केली आहे.
या प्रस्तावित शिक्षांबाबत नागरिकांच्या सूचना व हरकती मागवण्यात आल्या असून, राज्याच्या गृह विभागाने यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर लवकरच कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
