युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे अन् ठाकरे नेत्यांनीं हाती घेतलं ‘कमळ’

पुणे : नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या काल युतीची घोषणा झाली. या युतीच्या घोषणेनंतर नाशिकमध्ये भाजपने नुकताच एक मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मनसेचे मोठे नेते दिनकर पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ तसेच काँग्रेसचे शाहू खैरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना व मनसे युतीची घोषणा झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच ही घडामोड झाली, ज्यामुळे ठाकरे बंधूंना धक्का बसला आहे. या पक्षप्रवेशावेळी दिनकर पाटील यांनी केवळ “विकासासाठी” भाजपमध्ये जात असल्याचे नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले कारण त्यांनी दोनच दिवसांपूर्वी ठाकरे बंधूंच्या युतीचा जल्लोष केला होता. त्यानंतर लगेच त्यांनी आज भाजपात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान त्यांच्या या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला होता. दरम्यान, विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या भाजप प्रवेशाआधीच ठाकरेंच्या शिवसेनेमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. तशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली होती. आता निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी भाजपा प्रवेश केल्याने ठाकरे बंधूंना धक्का बसला आहे.

