नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून प्रवाशांच्या सेवेत; मुंबई महानगर प्रदेशाला दिलासा


मुंबई :बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून प्रवासी सेवा अधिकृतरीत्या सुरू झाली आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतूक वरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पहिल्याच दिवशी या विमानतळावरून ३० विमानांची रेलचेल असणार असून सुमारे ४ हजार प्रवासी या सुविधेचा लाभ घेणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात अत्याधुनिक प्रवासी सुविधा, विस्तीर्ण व सुरक्षित धावपट्या, आधुनिक टर्मिनल इमारती आणि नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था उभारण्यात आली आहे. यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित होणार आहे. प्रारंभी निवडक देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डानासह विमानतळाची सेवा सुरू करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने उडाणांची संख्या आणि प्रवासी क्षमता वाढवण्याचा प्रशासनाचा मानस असणार आहे.

या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्यान्वित होण्यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार ७० टक्क्यांनी कमी होणार आहे. सध्या या विमानतळावर दोन धावपट्ट्या कार्यरत आहेत. मात्र, भविष्यात तिसरी धावपट्टी उभारण्याचे नियोजन आहे. तिसरी धावपट्टी पूर्ण झाल्यानंतर, नवी मुंबई विमानतळ हे जगातील सर्वांत जास्त प्रवाशांची वर्दळ असलेले विमानतळ म्हणून नावारूपाला येईल. पहिल्या टप्प्यात वर्षाला सुमारे २ कोटी प्रवासी येथून प्रवास करतील, असा अंदाज आहे.

       

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. आजच्या पहिल्या टप्प्यात देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या कंपन्या आपली सेवा देणार आहेत. पुढील १५ दिवसांत विमानांची ही संख्या दररोज ४८ पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

दरम्यान या विमानतळामुळे नवी मुंबई,पनवेल, उरण तसेच आसपासच्या औद्योगिक व व्यापारी पट्ट्यांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच मुंबई शहरातील वाहतूक कोंडी आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे. एकूणच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्याने मुंबई महानगर प्रदेशाच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाचीं भर पडणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!