शिंदेंच्या शिवसेनेचा ‘मास्टर प्लॅन’ तयार! महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर, कोणा कोणाला स्थान?

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं असून सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय व राज्य मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते आणि युवा नेते यांचा समावेश आहे. रामदास कदम, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, योगेश कदम, दीपक केसरकर यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार राहुल शेवाळे या दिग्गज नेत्यांचा समावेश शिवसेनेकडून आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाची युती होण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत देखील युती होणार आहे. ज्या ठिकाणी अजित पवार गटासोबत युती होणार नाही, त्या ठिकाणी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान काल मुंबई महापालिकेसाठी अखेर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून युतीची अधिकृत घोषणा करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती,
मात्र युतीबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती, अखेर आज दोन्ही ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेसाठी युतीची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र लढवणार आहे.
