सावधान! पुढील तीन दिवस महत्वाचे, ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस, अलर्ट जारी…

पुणे : भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला असून 24, 25 आणि 26 डिसेंबरदरम्यान देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच काळात राज्यात कडाक्याची थंडी कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे.
तसेच डिसेंबर महिन्यातील थंडीने यंदा अनेक विक्रम मोडले आहेत. गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक एक अंकी किमान तापमानाची नोंद यावर्षी झाली असून पुण्यासह अनेक शहरांमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे.
डिसेंबरच्या अवघ्या 23 दिवसांत तब्बल 13 दिवस किमान तापमान एक अंकी नोंदले गेले असून हा गेल्या दशकातील मोठा विक्रम मानला जात आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीचा जोर अधिक वाढला आहे. धुळे जिल्ह्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून निफाड येथे तापमान थेट 5.8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.

परभणीत 7.5 अंश, तर नाशिक, जळगाव, नागपूर आणि भंडारा येथे 10 अंशांच्या आसपास तापमान नोंदवले गेले आहे. थंडीबरोबरच सकाळच्या वेळेत गारठाही मोठ्या प्रमाणात जाणवत असून मुंबईसारख्या शहरातही थंडीची चाहूल लागली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, जानेवारी महिन्यातही ही थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील थंड वारे आणि शीतलहरींचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवत असून संपूर्ण डिसेंबर महिना थंड राहणार असल्याचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. यंदाचा डिसेंबर हा 2014 नंतरचा सर्वात थंड डिसेंबर ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे.
थंडीच्या पार्श्वभूमीवरच भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. 24, 25, 26 आणि 27 डिसेंबरदरम्यान हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, लडाख, कर्नाटक, अंदमान, पुद्दुचेरी आणि कराईकल या भागांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मॉन्सून संपून अनेक महिने झाले असले तरी काही भागांमध्ये अजूनही पावसाची स्थिती कायम असल्याचे चित्र आहे.
