महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर संपला! दोन दिवसात होणार मोठी घोषणा, महत्वाची माहिती आली समोर..

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात तब्बल ५ तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडली.
रात्री उशिरा सुरू झालेली ही चर्चा पहाटे ४ वाजेपर्यंत सुरु होती. या बैठकीत जागांच्या संख्येवरून आणि विशिष्ट प्रभागांमधील ताकदीवरून सविस्तर चर्चा करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यांचा आदर राखत निवडून येण्याची क्षमता हा मुख्य निकष ठेवला आहे.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती या बैठकीला केवळ वरिष्ठ नेतेच नव्हे, तर समन्वयासाठी महत्त्वाचे असलेले शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के आणि सरचिटणीस राहुल शेवाळे हे देखील उपस्थित होते.

मुंबई आणि ठाण्यातील राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या बैठकीत अत्यंत खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले. केवळ आकडेमोड न करता, नेत्यांमध्ये विविध विषयांवर हास्यविनोदही झाले.
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांवर या बैठकीत दीर्घकाळ चर्चा झाली. या बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनी मोदींसोबतचे आपले वैयक्तिक अनुभव आणि त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा याबद्दल आवर्जून एक गोष्ट सांगितली. या बैठकीत मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी १५० जागांवर तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उर्वरित ७७ जागांचा तिढाही सुटला आहे.
