ठाकरे बंधूंच्या ‘त्या ‘निर्णयामुळे एकनाथ शिंदेचं टेन्शन वाढलं; बालेकिल्ल्यातच खेळी

मुंबई :आगामी महापालिका निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशातच आता ठाकरे बंधूंच्या एका घोषणेमुळे एकनाथ शिंदे यांचे टेन्शन वाढले आहे. ठाकरे बंधू थेट एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात एकत्र लढणार आहेत. ठाण्यासह मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई येथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र उतरणार आहेत. या महानगरपालिकेमध्ये दोन आकडी नगरसेवक जिंकून येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ठाणे शहरात ठाकरे बंधूनी लक्ष केंद्रित केले आहे. तर, कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात देखील दोन जागा मनसे लढणार आहे. येत्या तीन अथवा दहा तारखेला ठाण्यातील महत्त्वपूर्ण अशा गडकरी रंगायतन येथील चौकात ठाकरे बंधूंची आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र सभा पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे पक्षाचा वर्चस्व जास्त असल्याने मोठ्या ताकदीने ठाकरे बंधू कोपरी पाच पाखाडी मतदारसंघात उतरणार आहेत.त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तर, दुसरीकडे ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना युती हवी असली तरी भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मात्र युती विरोधात सूर कायम ठेवला आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे बंधूंची युती एकनाथ शिंदेंना टक्कर देणार आहे.

