मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा दिवस अन् वेळ ठरली,संजय राऊतांचं ट्वीट…

मुंबई :राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मनसे आणि ठाकरे गटाची युती उद्या दुपारी १२ वाजता अधिकृतपणे जाहीर केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्वीट करून युतीच्या घोषणेचा दिवस आणि वेळ जाहीर केली आहे.शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती निश्चित झाली असून काल (२२ डिसेंबर) रात्री झालेल्या बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले.नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, ठाणे आदी महापालिकांमधील जागा वाटपांबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरें आणि राज ठाकरे हे कुटुंब म्हणून पुन्हा एकत्र आले आहेत. राजकीय मंचावरही एकत्र दिसले आहेत. मात्र, राज ठाकरे यांच्याकडून युतीच्या घोषणेवर अद्याप शिक्कामोर्तब केले जात नसल्याचे सांगत येत होते. मात्र आता
या युतीच्या घोषणेमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी मुंबईसह ठाणे आणि इतर महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मुंबईतील काही जागांवरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. आता दोन्ही पक्षाकडून युती होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.

