पुण्यात शरद पवारांना धक्का! शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा

पुणे :आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे.पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावी, अशी भूमिका समोर येताच प्रशांत जगताप यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर आता शरद पवारांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे असा अंदाज बांधला जात आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत एक समिती गठित करण्यात आली होती. त्यात प्रशांत जगताप यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिला असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने समिती गठित झाल्यानंतर शहराध्यक्षपदी असताना देखील चर्चेसाठी सहभागी न केल्याने प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली अन् यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अजितदादांसोबत हातमिळवणी करण्यास शरद पवार गटाने सकारात्मक दृष्टीकोन दाखवल्याने प्रशांत जगताप नाराज होते. त्यांच्या राजीनाम्याने पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.

