लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार! कुप्रसिद्ध गुंड राज पवारच्या आई-वडिलांनी अंगावर रॉकेल ओतून केला गोंधळ; नेमकं काय घडलं?

लोणी काळभोर : रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी कुप्रसिद्ध गुंड राज पवार सह १६ जणांवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात राज पवारला लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्याला घेऊन घटनास्थळची पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी नाही तर धिंड काढली आहे.
त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. असे गंभीर आरोप करून राज पवारच्या आई वडिलांनी अंगावर रॉकेल ओतून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारांस घडला आहे.
राजचे आई संगीता व वडील रविंद्र पवार हे रविवारी पोलिस ठाण्यात आले व काहीही गुन्हा केलेला नसताना आमच्या मुलावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी आमच्यावर अन्याय केला आहे. तसेच राजची आज विनाकारण धिंड काढली आहे. माझ्या मुलाला आताच्या आता सोडा. आम्हाला न्याय द्या. अन्यथा आम्ही दोघेही जीवन संपवून टाकतो. असे म्हणून पोलिस ठाण्यात तब्बल अर्धा तास गोंधळ घातला.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार (१८ डिसेंबर) रोजी राज पवारचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे हवेली व पुरंदर तालुक्यातील अनेक मित्र कदमवाकवस्तीत आले होते. यावेळी राज पवार याने बेकायदेशीर जमाव जमवून वाहतुकीचा रस्ता अडविला होता. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. व पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात केला.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ १३ जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रविण लक्ष्मण नाझीरकर (वय २१), ओम गणेश चव्हाण (वय २०), हर्षद नारायण चव्हाण (वय २१), आदित्य दादा गायकवाड (वय १९), अनिल मानसिंग होमणे (वय ३०), हर्षल शंकर जगताप (वय १९ ), अनिकेत महेश जांभळे (वय २३), सनि जयवंत भोसले (वय १९), सौरभ संतोष मस्के (वय १९), अभिषेक महेश जांभळे (वय २५ ), महेश संपत नाझीरकर (वय १९), कृष्णा सुरेश आरण (वय १९, सर्व रा. जेजुरी ता. पुरदंर जि. पुणे), सुदाम गुलाब चव्हाण (वय १९ रा. वासुली फाटा, म्हाळुंगे चाकण ता. खेड जि. पुणे) यांचा समावेश आहे. तर राज रविंद्र पवार, नटराज शिवाजी कदम, प्रेम तानाजी गायकवाड (सर्व रा. गुजरवस्ती कवडीपाठ टोलनाका कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) हे तिघेजण फरार झाले होते. फरार झालेल्या राज पवारला लोणी काळभोर पोलिसांनी आज रविवारी अटक केली.
राज पवारला अटक केल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस राज पवारला घेऊन गेले होते. यावेळी लोणी काळभोर पोलिसांकडून धिंड काढली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याचाच राग मनात धरून राज पवारच्या आईवडिलांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या दोघांची समजूत काढण्यास पोलिसांना अथक परिश्रम करावे लागले.
